
कुख्यात अबू सालेमला ‘सर्वोच्च’ दणका; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुदतपूर्व सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…
नवी दिल्लीः १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमची २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर सुटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
दरम्यान, २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणताना २५ वर्षांपेक्षा अधिक कारावास न देण्याचे भारत सरकारने आश्वासन दिले होते. अंडरट्रायल काळ, दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि चांगल्या वर्तणुकीची रिमिशन मोजल्यास ३१ मार्च २०२५ रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्याचा सालेमचा दावा होता. तर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केंद्राने लवकर सुटकेची प्रक्रिया सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पोर्तुगालमधील पासपोर्ट फसवणूक प्रकरणातील कारावासाचा कालावधी २५ वर्षांत मोजता येणार नसल्याचे, न्यायालयाने स्पष्ट केले होते. परिणामी मुंबई उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही सालेमच्या सुटकेच्या मागणीला नकार दिला असून, सुटका करण्याची त्याची मागणी न्यायालयाने फेटाळून मोठा झटका दिला आहे.
दरम्यान, मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सालेमने न्यायालयात युक्तिवाद केला की, जेव्हा त्याला पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले तेव्हा भारत सरकारने पोर्तुगीज सरकारला २५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आणि सांगितले, की सालेमला २५ वर्षांनंतर म्हणजे २०३० पर्यंत सोडण्यात यावे. ३१ मार्च २०२५ रोजी २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असल्याने सुटका करावी, अशी मागणी केलेल्या गँगस्टर अबू सालेमने उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला दिले होते. अबू सालेम सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहे. अबू सालेमच्या वकील फरहाना शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि अद्वैत सेठना यांचे खंडपीठ सुनावणी करत होते. याचिकेत ११ जुलै २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे महत्त्वाचे निरीक्षण नमूद केले होते, जे अबू सालेमच्या अपीलावर आधारित होते.

