
कर्ज परतफेडीवरून महिलेला विवस्त्र करून मारहाण आणि चित्रीकरण; बंगळूरमध्ये चौघांना अटक…
बंगळूरु: कर्जावरील व्याज न भरल्यामुळे एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी, बंगळूरमध्ये दोन महिलांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते ऑनलाइन प्रसारित करण्याची धमकीही दिली होती.
आरोपींची नावे नाझरथ, रेश्मा, सुहेल आणि सैफ अशी आहेत. पीडित व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी रेश्माकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून व्याज भरलेले नाही.
पीडितेने रेश्माच्या माध्यमातून ओळख झालेल्या नाझरथकडून ५०,००० रुपये कर्ज घेतले होते आणि दर आठवड्याला ५,००० रुपये परतफेड करत होती. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ती सुमारे चार आठवडे पैसे भरू शकली नाही.
ही महिला म्हणाले, की छळाच्या भीतीने तिने नंतर रेश्माचा नंबर ब्लॉक केला आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली. याच काळात नझरथने तिला फोन करून काम आणि पैशांचे आश्वासन दिले. जेव्हा ती नाझरथच्या घरी गेली, तेव्हा सुहेलने तिचा अपमान केला आणि हल्ला केला.
पीडितेने असाही आरोप केला आहे, की तिला जबरदस्तीने ऑटोरिक्षात बसवण्यात आले. रेश्मा आणि नाझरथ तिच्या बाजूला बसले होते, तर सुहेल आणि इतर दोघे त्यांच्यासोबत होते. त्यांनी त्या महिलेला बंगळूरूच्या बाहेरील कुंबलगोडूजवळील एका घरात नेऊन तिथे डांबून ठेवले. पीडितेचे कपडे काढून तिच्यावर हल्ला करण्यात आला.
पीडितेच्या आईने ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या चालू आहे.

