
ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण अपघात; जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…
नवी मुंबई: ठाणे-बेलापूर मार्गावरील पावणे एमआयडीसी परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जावई आणि सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
या अपघातात राज पंचम जैसवार (वय ४२) आणि त्यांचे सासरे शिवमुरत रामलोचन जैसवाल (वय ६१) यांचा मृत्यू झाला. दोघेही खैरणे गाव येथील रहिवासी होते. बुधवारी सायंकाळी राज हे आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीवरून ठाण्याच्या दिशेने जात होते. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांची स्कूटी पावणे एमआयडीसीतील खैरणे पुलाखालील नाल्याजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

