चिंतामणी’च्या आगमन सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ

मुंबईः चिंचपोकळी चिंतामणी गणपतीच्या आगमन मिरवणुकीसाठी शनिवारी जमलेल्या प्रचंड गर्दीचा चोरट्यांनी गैरफायदा घेतला. या गर्दीत अनेक भाविकांचे सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत करी रोड येथील ज्योती निखिल राणे या आपल्या बहिणीसोबत गणपतीच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लालबाग परिसरात आल्या होत्या. दुपारी गर्दीत उभ्या असताना, एका अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे, सुमारे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकारात राणे यांच्या मानेस दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दुसऱ्या घटनेत १८ वर्षीय आदित्य अनंत सावंत याच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरीला गेली. या घटनेत आदित्य सावंतलाही किरकोळ दुखापत झाली.

आर्यन सागर गायकवाड हा मित्रांसह मिरवणुकीसाठी आला होता. दुपारी त्याच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा आयफोन-१२ चोरीला गेला. अर्जुन राजभर यानेही त्याच्या भावाचा काळ्या रंगाचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा आयफोन-११ करी रोड येथील अविघ्न इमारतीजवळून चोरीला गेल्याची तक्रार केली.

नरेंद्रसिंह बलजीतसिंह बाजवा यांनी सांगितले, की सायंकाळी सुमारे ५ वाजता त्यांच्या खिशातील सुमारे १ लाख रुपये किंमतीचा आयफोन-१७ प्रो चोरीला गेला. इतर अनेक भाविकांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले आहे. चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये आयफोन-१७ प्रो, आयफोन-१७ प्रो मॅक्स, आयफोन-१७, आयफोन-१६, आयफोन-१५ प्लस, व्हिवो एक्स-३०० प्रो, मोटोरोला एज-६० प्रो आणि रेडमी ए-४ ५जी अशा महागड्या मोबाईलचा समावेश आहे.

या चोरीला गेलेल्या मोबाईलची एकूण किंमत ८.२७ लाख रुपये आहे. गर्दीचा फायदा घेत या चोऱ्या एखाद्या संघटित टोळीने केल्या आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!