
पिंपरी-चिंचवड पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये रंगला चकमकीचा थरार; गोळीबारात दरोडेखोर जखमी…
पुणे: दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला झाला आहे. पोलिस उपायुक्तांनीसुद्धा बचावासाठी गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झाला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले आहेत. चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
एका घरावर गेल्या आठवड्यात या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता, तेव्हा पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. मात्र याच टोळीतील आणखी दोघे काल पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. डीसीपी शिवाजी पवार यांनी एपीआय प्रसन्न जराड यांच्यासह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचे लक्षात आले. मग त्या परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी रात्री सव्वा बाराच्या सुमारास दोघांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र, दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस पकडण्यासाठी पुढे जाताच एक अल्पवयीन निसटला तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला.
डीसीपींनी बचावासाठी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर ही दरोडेखोराने डिसीपींवर कोयत्याने वार केला, डीसीपी पवार थोडे मागे हटले. मात्र वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. डीसीपी पवार रक्तबंबाळ झाले. अशात त्यांनी एक गोळी झाडली, ती दरोडेखोराने चुकवली. एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढं आले, त्याने त्यांच्यावर ही वार केला. जराड यांच्या डाव्या खांद्यावर वार झाला. मग जखमी अवस्थेत असलेल्या डिसीपींनी दुसरी गोळी थेट पायावर झाडली, यात दरोडेखोर जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आले.
दुसरीकडे पळून निघालेल्या अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतले. जवळपास वीस मिनिटं पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपींच्या छातीवर पाच टाके पडले आहेत. ते थोडक्यात बचवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जराड यांना ही जखम झाली आहे. उपचारानंतर दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. जखमी दरोडेखोरावर उपचार सुरू असून, अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी पवार, एपीआय जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…
पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…
पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशाल अगरवाल याला कारागृहातूनच केली अटक…

