आई-वडील झोपल्याची संधी साधून छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून चिमुकलीचे अपहरण; संशयित सीसीटीव्हीत कैद…

मुंबई: आई-वडिलांसोबत गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आई-वडील झोपलेले असताना एका अज्ञात महिलेने चिमुकलीला उचलून नेल्याचा आरोप आहे. सकाळी जाग आल्यानंतर मुलगी जवळ नसल्याचे पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित महिलेचा शोध सुरू आहे.

तक्रारदार गौरी पवार (वय २०) या घाटकोपर पश्चिम परिसरात राहून मजुरी करतात. गुरूवारी (ता. १५) त्या पती आणि एक वर्षाच्या मुलीसह लातूर एक्स्प्रेसने मूळ गावी उस्मानाबादला निघाल्या होत्या. त्यासाठी हे कुटुंब सायंकाळी सातच्या सुमारास सीएसएमटी स्थानकात पोहोचलं. फलाट क्रमांक १२ आणि १३ जवळील मुख्य हॉलमध्ये एका बाकाजवळ ते बसले होते.

रात्री आठच्या सुमारास हे कुटुंब जेवणासाठी स्थानकाबाहेर गेले होते. रात्री दहाच्या सुमारास ते परत आल्यानंतर त्यांची गाडी निघून गेली होती. त्यामुळे तिघांनीही स्थानकातच रात्र काढण्याचा निर्णय घेतला. फलाट क्रमांक १२ आणि १३ जवळील एका स्टीलच्या बाकाशेजारी ते झोपले.

पहाटे चारच्या सुमारास गौरी यांना जाग आली. त्यांनी मुलीला दूध पाजले आणि पुन्हा झोपी गेल्या. त्यानंतर सकाळी सव्वापाचनंतर पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज ऐकून त्या जाग्या झाल्या. मात्र, शेजारी झोपलेली मुलगी दिसत नव्हती. मुलगी अचानक गायब झाल्याने दोघेही घाबरले. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर त्यांनी फलाटावर उपस्थित असलेल्या महिला पोलिसांकडे मदत मागितली.

तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात लाल रंगाचा कुर्ता घातलेली अंदाजे २५ ते ३० वर्षांची महिला झोपलेल्या चिमुकलीला उचलून नेत असल्याचे दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीचे आई-वडील झोपेत असतानाच संशयित महिलेने तिला तिथून नेल्याचा आरोप आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!