
अभिनेता सोनू सूद याच्या विरोधात अटक वॉरंट जारी…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला एका फसवणुकीच्या प्रकरणात पंजाबमधील लुधियाना कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. अंधेरी पश्चिम पोलिसांनी सोनूला अटक करून त्याला न्यायालयात हजर करावे, असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. पंजाबच्या लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले आहे.
लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीविरोधात दहा लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, त्यांना बनावट रिजिका कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यात पैसे गुंतवले तर चांगला आर्थिक फायदा होईल, असे आमिष आरोपींकडून देण्यात आले होते. ज्या कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते, त्या कॉईनचे ब्रँड अॅम्बेसेडर सोनू सूद असल्याचा आरोप आहे.
सोनू सूदचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. पण या फसवणूक प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोर्टाकडून सातत्याने सोनू सूदला बोलवण्यात येत होते. मात्र सोनू कोर्टात हजर झाला नाही. यामुळेच त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. लुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, सोनू सूदला समन्स बजावून देखील तो उपस्थित राहण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, सोनू सूद याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, माझा या फसवणुकीच्या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. मी अशा कोणत्याही कॉईनचा ब्रँड अम्बेसेडर नाही. यापूर्वी माझ्या वकिलांकडून याबाबत कोर्टात प्रतिसाद देण्यात आला आहे. 10 तारखेला यावर पुन्हा मी माझी बाजू कोर्टात मांडणार आहे.
अभिनेता सैफ अली खानने जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याची घेतली भेट…
भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…
साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…
अभिनेत्रीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन अभिनेत्यांविरोधात गुन्हा दाखल…

