
जुन्या सांगवीत दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यावर पडून महिला मृत्यूमुखी…
पिंपरी: दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचे काम चालू असताना, अचानक सांगाड्याचा एक भाग अचानक सलमा सलाउद्दीन पठाण (वय 45) महिलेच्या डोक्यावर कोसळून त्या मृत्यूमुखी पडल्या. दहीहंडीचा उत्सव झाल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मंडळाचे कार्यकर्ते लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते. सांगाड्याचा एक अवजड भाग अचानक खाली उभ्या असलेल्या सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या सलमा यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत सलमा यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुलाचा या मंडळात सहभाग असल्याच्या कारणामुळे पठाण कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला आहे. तरीही, या गंभीर आणि अपघाती घटनेची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेण्याची विनंती कुटुंबीयांना केली असून, या घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
दरम्यान, आज राज्यभरात दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत आहे. या महोत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत.
गोविंदा पथकांचा मोठा सहभाग आणि ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईतील घाटकोपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीमध्ये, अखिल मालपा डोंगरी अंधेरीच्या गोविंदा पथकाने पहिले नऊ थर उभारले. यंदा मुंबईमध्ये ९ थर लावणारे अखिल मालपा डोंगरी पथक पहिले ठरले. ९ थर लावण्यानंतर खाली उतरताना नवव्या थरावरील गोविंदा कोसळला.

